Blog 
मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मुखपाक वा तोंड येणे

मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मुखपाक वा तोंड येणे

काही दिवसांपूर्वी एक तरुण मुलगा तोंड आलं आहे म्हणून रुग्णालयात दाखवायला आला होता. कित्येक दिवस अ‍ॅलोपॅथीची औषधे घेऊन सुद्धा हा त्रास सतत का होतोय म्हणून यावेळी आयुर्वेदाची औषधे घेऊन बघू असा विचार त्याने केला होता. तोंड आले की आजकाल प्रत्येकाच्या तोंडात प्रथम ‘बी- कॉम्प्लेक्स’च येते. कारण याच्याच कमतरतेमुळे हा ‘ओरल स्टोमाटायटीस’ होतो असे आता पक्के आपल्या मनात िबबवले गेले आहे. मात्र आयुर्वेदात याचे काही वर्णन आहे का व यावर काही उपाय आहेत का हे त्यास जाणून घ्यायचे होते.

आयुर्वेदात तोंड येण्यालाच ‘मुखपाक’ किंवा ‘सर्वसर’ असे म्हणतात. साधारणत: पित्त वाढले की तोंड येते असे सामान्यपणे समजले जाते. मात्र आचार्य वाग्भटांनी याचे वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सांनिपातिक असे पाच प्रकार सांगितले आहेत. पित्तवर्धक आहार करणे, वेळी अवेळी जेवण करणे, फार काळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवण करणे, दिवसभर अधिक प्रमाणात चहा घेणे, तंबाखू, पानमसाला, गुटखा इत्यादींचे सतत सेवन करणे तसेच रात्रीचे जागरण करणे, अतिउष्ण पदार्थाचे सेवन करणे, आहारात तिखट व मिठाचे प्रमाण अधिक असणे, मांसाहार इत्यादी कारणांमुळे मुखाच्या आतल्या बाजूला किंवा ओठाच्या आतल्या बाजूला कधी कधी जिभेवर लहान लहान ‘गर’ उठतात. तेथील त्वचा सोलवटली जाते. जीभ जड होते. तोंडाच्या हालचाली करण्यास त्रास होतो. अतिथंड किंवा उष्ण पदार्थाचा स्पर्श सहन होत नाही. शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नाहीत. अशी एक वा अनेक लक्षणे दिसू लागली की समजावे आपल्याला तोंड आले आहे. काहींना तर यामुळे ओठांवर ‘जर’ उठू लागतात. मात्र हे ‘जर’ वेगळे व तोंडाच्या आतील ‘गर’ वेगळे.  बहुतांशी मुखपाकांचे कारण हे पोटात दडलेले असते. ज्याप्रमाणे आपली जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे असे समजले जाते त्याचप्रमाणे आपल्या जिभेवर, ओठांवर अथवा गालाच्या आतल्या बाजूला आलेले मुखपाक हे बिघडलेल्या पोटाचे द्योतक आहेत.

किंबहुना बऱ्याचदा पोटातील अल्सर व मुखातील अल्सर हे एकाच प्रकारचे असतात. कारण आपली आभ्यंतर त्वचा मुखापासून गुदापर्यंत एकच आहे. म्हणूनच ज्यांना सततचा  मलावष्टंभाचा त्रास होत असतो त्यांना सारखेच मुखपाक होत असतात.

तसेच ‘ग्रहणी’ या पोटाच्या आजाराचे लक्षण स्वरूपातसुद्धा मुखपाक येतात. क्वचित ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना काही काही

दिवसांनी मुखपाक होत असतात. पण  बरेच दिवस असणारे, स्राव असणारे, ज्यांच्या कडा जाड झाल्या आहेत असे मुखपाक वेळीच तपासून घ्यावेत. कारण बऱ्याचदा यांचे रूपांतर भविष्यात कर्करोगामध्ये होण्याची शक्यता असते किंवा हे इतर एखाद्या पोटाच्या मोठय़ा आजाराचेही द्योतक असू शकतात. अशा प्रकारांत सततचे तंबाखू, गुटखा अशा अमली पदार्थाचे सेवन हा हेतूसुद्धा असू शकतो. मात्र प्रत्येक मुखापाक हा वेगळा समजून त्याचे निदान शोधून वैद्याच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हाच याच्या त्रासापासून कायम मुक्त होण्याचा मार्ग आहे. कारण ताप अधिक दिवस राहिला, अंगात मुरला तरी तोंड येते. म्हणून प्रत्येक प्रकारानुसार त्याची चिकित्सा बदलते. पण साधारणत: सामान्य कारण जाणवल्यास पूर्वीच्या काळी  घरगुती औषधांमध्ये जाईची पाने चघळण्यासाठी दिली जात असत. त्याने लाळ गाळली की मुखपाक दोन दिवसांत बरा होत असे. मध लावणे, तूप लावणे, तोंडले खाणे असे उपचार काही क्षणिक कारणांनी उत्पन्न मुखपाकात तात्काळ आराम देतात.

थंड पाण्यात मध मिसळून त्याने गुळण्या केल्यानेही लगेच आराम पडतो. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यासही मुखापक लवकर बरा होतो. काहींना पडलेले व्रण कित्येक दिवस बरेच होत नाहीत. काहींचे काहीही औषध न घेताच दोन-तीन दिवसांत बरे होतात. तर काही मुखपाकांसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले.

बहुतांशी मुखपाकाचे कारण हे बिघडलेले पोट असते, म्हणून प्रथम आपली पचनशक्ती चांगली करण्याकडे लक्ष द्यावे. लक्षात ठेवा अनेक आजारांत लक्षण स्वरूपात मुखपाक होत असतो म्हणून प्रत्येक मुखापाकाचे कारण शोधून चिकित्सा करावी तसेच सर्वच विकारांत प्रथम तोंडचे विकार बरे करावेत. कारण मुखामध्ये आपल्या अन्नपचन प्रक्रियेची सुरुवात होत असते. ही सुरुवातच बिघडल्यास अन्नपचन प्रक्रियाच बिघडू लागते व छोटा वाटणारा हा आजार भविष्यात पोटाच्या एखाद्या मोठय़ा आजाराला निमंत्रण देतो.

You may also like