Blog 
मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मणक्यांचे विकार

मुखपृष्ठ » लोकसत्ता » चतुरंग » आयुर्वेदाच्या स्मृतीतून » मणक्यांचे विकार

आजकाल एक भावनिक जाहिरात आताच्या सर्व आज्जीबाईंना भुरळ घालू लागली आहे. त्यात विमानतळावर नातीला आणायला गेलेली आज्जी नातीला पाहून खूश तर होते, मात्र दुखणाऱ्या पाठीच्या मणक्यामुळे तिला कडेवर उचलून तिचा ‘पापा’ नाही घेऊ  शकत. मग तिची मुलगी तिला काही ‘कॅल्शियम’च्या गोळ्या खाण्याचा सल्ला देते, ज्यामुळे उतारवयामध्ये हाडांची होणारी झीज भरून निघेल व तिला पाठीचे दुखणे होणार नाही, असे सांगते. आहारातील ‘स्नेह’ (तूप) कमी झाल्याने नात्यातील स्नेह जपण्यासाठीसुद्धा आजकाल ‘गोळ्या’ घ्याव्या लागत आहेत. विमानतळावर जसा हा पाश्चिमात्य देशातून आलेल्या व्यक्तीचा त्याच्या शिक्षण पद्धतीमुळे विचारात बदल झाला अगदी तसाच काहीसा बदल आपल्या शिक्षण पद्धतीत गेली दीडशे वर्षे झालेल्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे झाला आहे. म्हणून आजकालची ‘आज्जी’च बदलू लागल्याने हळूहळू आज्जीबाईंचा बटवाही बदलू लागला आहे. म्हणून पूर्वीच्या काळी आज्जीबाईंच्या बटव्यातील बिब्बा, खोबरे, खारीक, चंदन.. अशा अनेक औषधांची जागा आता डोकेदुखीवरच्या गोळ्या, सर्दीवरची औषधं तसेच कॅल्शियम, प्रोटीन, बी-कॉम्प्लेक्स घेऊ  लागले आहेत आणि एका वेगळ्याच विचारांच्या ‘कॉम्प्लेक्स’मध्ये ही पिढी अडकून पडली आहे. जुने जगणे शिक्षणामुळे मनाला पटत नाहीये आणि नवे जगणे नीट सुखाने जगू देत नाहीये. जुन्या आज्जीचा मणका अजूनही ताठ आहे, मात्र नव्या आज्जीला आज्जी म्हणू नये अशा वयातच पाठीचा मणका नीट सरळ उभाही राहू देत नाहीये. हा पाठीच्या मणक्यात झालेला विलक्षण बदल आपल्याला डार्विनच्या उत्क्रांतिवादाची आठवण करून देतो, कारण पाठीच्या ‘मणक्याचा आकार’ हाच त्याच्या उत्क्रांतिवादाचा खरा दुवा होता, तर ‘मणक्याचा विचार’ हा आत्ताच्या मणक्यांच्या वाढत्या विकारांच्या उत्क्रांतीचा दुवा आहे. पूर्वीची आज्जी रोज सकाळी पहाटे उठून नित्यकर्मे आवरून, जात्यावर दळण दळत असे. झाडून काढणे, अंगण शेणाने सारवणे, मोटीचा वापर करून पाणी शेंदणे, डोक्यावर तोल सांभाळत कित्येक मैल चालत दोन दोन घागरी पाणी आणणे, तर अगदी नदीवर वरच्या दिशेने हात जोरात फिरवून आदळून आपटून कपडे धुणे, ही प्रत्येक क्रिया कळत नकळत त्या मणक्याचा व्यायाम करून घेत असे व त्याचे आरोग्य जपत असे. अगदी याच हालचाली आता आपण जीममध्ये किंवा फिजिओथेरपीमध्ये अनेक पैसे देऊन करत असतो. बदल हा हळूहळू होत असतो. आता एक बटन दाबले की पाणी भरले जाते, कपडे धुतले जातात, धान्य दळले जाते, एवढेच नव्हे तर अगदी रूमसुद्धा बटन दाबले की स्वच्छ होते. पूर्वीच्या काळी बायका फार काम झाले की कुठे पाठ टेकवायला जागा मिळतेय का हे शोधत असत, तर आताच्या बायकांना घरात, गाडीत, ऑफिसमध्ये सतत पाठीला आधार द्यायला सोफा किंवा खुर्ची जणू त्यांची वाट बघत बसलेलीच असते. आजकाल पाठीच्या आधारासाठी घेतलेली उशी किंवा गादीसुद्धा एवढी मऊसर असते की, तिलाच कशाचा तरी आधार द्यावा लागतो. मस्त मांडी घालून बसून करावयाच्या स्वयंपाकाची किचन ओटय़ाने घेतलेली जागा, पाळीच्या काळात न घेतलेली विश्रांती, ऑफिसच्या कामात बाळंतपणानंतर राहून गेलेली शेक शेगडी, फॅशनच्या नावाखाली साध्या चप्पलची ‘हायहिल’ने केलेली हकालपट्टी, ओटीभरणासाठी असलेल्या गुळखोबऱ्याची ‘रिटर्न गिफ्ट’ने केलेले शिफ्टिंग, एवढेच काय, पण अगदी वाकून केल्या जाणाऱ्या नमस्काराची जागासुद्धा जेव्हा ‘मिठी’ घेते तेव्हा ‘पाठी’ मात्र फक्त दुखणेच लागते. तसेच आहारातून हद्दपार झालेले तूप, थंडीच्या काळात पाठीला मिळणारे तेल, असे सगळेच अगदी उतारवयात त्या पाठीच्या मणक्याशी जणू बोलू लागतात. मग पाठ दुखणे, कंबर दुखणे, मणका सरकणे, मणक्यात गॅप वाढणे, पाठीचा कणा वाकणे अथवा कंबर धरणे, जड वाटणे, हातापायांना मुंग्या येणे, पाठीतील नस दबणे किंवा सायटिकासारखे अनेक पाठीचे आजार मागे लागतात. या सर्वाना वेळीच पुन्हा एकदा हरवलेला आहारातील स्नेह तूप, तेल, चटण्या यांच्या माध्यमातून दिला गेला. पाठीला तेल लावण्याबरोबरच पाठबांधणी, पंचकर्मासारखे उपचार केले गेले. योग्य प्राणायाम, योगासने, व्यायाम केला गेला आणि पाठीला पुरेशी व योग्य विश्रांती मिळाली की हे आपोआपच बरे होते. त्यासाठी अन्य कसल्याही ‘गोळ्या’ घ्यायची गरज पडत नाही. लक्षात ठेवा, गरज ही फक्त एकतर्फी पूर्ण करू नका. आपल्या पाठीला नक्की काय हवंय तेही जरा ऐका. तिला पांगळे करू नका. तिचा वापरही करा. नाही तर ताठ उभं राहाणंच हरवून जाऊ आपण.

You may also like